पंढरपूर -पंढरपूर विभागात महावितरण कंपनीची घरगुती व शेती पंप दोन्ही मिळून सुमारे 1562 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महावितरण मंडळाकडून गेल्या दहा महिन्यांपासून थकबाकी न भरलेल्या ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नोटीस पाठवण्यात येत आहे. ग्राहकांनी थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजय गवळी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
महावितरण मंडळाकडून शेती पंपधारक ग्राहकांसाठी योजना
राज्याच्या वीज मंडळाकडून शेती पंपाच्या थकबाकीवर 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. ही मुदत 2024 पर्यंत असणार आहे. पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या तालुक्यातील एक लाख आठ हजार शेतकऱ्यांकडे शेती पंपाची थकबाकी जवळपास दिड हजार कोटींच्या घरात आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गावांमध्ये जाऊन वीजबिल भरण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, कार्यशाळा, शिबिरे घेण्यात येत आहेत. महावितरणकडून थकीत वीज बिलाबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे, तसेच ग्रामपंचायत, पतसंस्था, साखर कारखान्यांकडून देखील थकबाकी वसूल करण्यात येत आहे. या थकबाकी वसुलीच्या तीस टक्के रक्कम संबंधित संस्थांना देण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे.