सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणूक प्रचाराचा झंझावात शांत झाला आहे. ही पोटनिवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. महाविकास आघाडी व भारतीय जनता पार्टीकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारामध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. राज्याच्या राजकारणामध्ये आता पंढरपूरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. अपक्ष उमेदवारांनी देखील आपली दावेदारी मजबूत केली आहे. उद्या (17 एप्रिल) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
17 एप्रिलला होणार मतदान -
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके यांच्या निधनामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या रिक्त जागेसाठी 17 मार्चपासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली तर चार एप्रिलपासून प्रचाराची सुरूवात झाली. यामध्ये प्रचार सभा, प्रचार फेऱ्या, भेटी-गाठी घेण्यात आल्या. अनेक दिग्गज नेत्यांनी सभा घेऊन प्रचाराचा धुरळा उठवला. 17 एप्रिल रोजी मतदार उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.
महाविकास आघाडी व भाजपच्या प्रतिष्ठेची लढाई -
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या पोटनिवडणुकींमध्ये सर्वात जास्त प्रतिष्ठेची झाली आहे. महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना रिंगणात उतरवण्यात आले. त्यांच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता मामा भारणे, आमदार संजय शिंदे, शिवसेनेचे गुलाबराव पाटील, उदय सामंत तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार प्रणिती शिंदे यांनी तळागळातील कार्यकर्त्यांना सोबत घेत सर्व मतदारसंघ पिंजून काढला. राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा दगाफटका बसणार नाही, याची त्यांनी काळजी घेतली. भाजपचे समाधान आवताडे यांनी आमदारकीसाठी जोर लावला आहे. त्यांच्या प्रचाराची यंत्रणाही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांभाळली. सभा व प्रचार रॅलीतून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे त्यांच्या उमेदवारासाठी एकटेच खिंड लढवत आहेत.