सोलापूर - माघवारी पालखी सोहळ्याचे रविवारी भव्य असे गोल रिंगण मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे पार पडले. त्यानंतर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तत्पुर्वी अश्वाचे मानकरी ह.भ.प.सौदागर महाराज जगताप यांच्या प्रतिमेला अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कुरुल ग्रामस्थांच्यावतीने अश्व पूजन करण्यात आले.
विठूनामाच्या जयघोषात कुरुलमध्ये रंगलं माघ वारीचं गोल रिंगण - माघ वारीचं गोल रिंगण
सोलापूर जिल्ह्यातील कुरुल येथे माघवारी पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
वारकरी संप्रदायात सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या चार मुख्य वाऱ्या आहेत. यापैकी एक मुख्य वारी म्हणून माघवारी मानली जाते. इतर वाऱ्यांपैकी फक्त याच वारीला स्थानिक सोलापूरकर वारकरी तसेच भाविक पंढरीत येतात. तर उर्वरीत वाऱ्यांना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र कोकणातला वारकरी येत असतो. दक्षिण भारतातील वारकरी या कार्तिकी एकादशीला पंढरपूरला येऊन विठ्ठल रुक्मीणीचं दर्शन घेतात.
माघ एकादशीला कानड्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेले हे वारकरी तिऱ्हे मार्गे पंढरपूरला पायी जातात. या प्रवासात त्यांचं गावोगावच्या ग्रामस्थांकडून स्वागत केलं जातं. यावेळी रंगणाऱ्या रिंगण सोहळ्यात दिंडी मार्गातील कष्टकरी वर्ग मोठ्या निष्ठेनं सहभागी होतो. तर हे सर्व वारकरी माघी एकादशीनंतर परत आपल्या गावी जातात.