सोलापूर- उजनी आणि वीर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चंद्रभागेच्या पात्रात आल्याने पंढरपूरचा सोलापूर आणि मराठवाड्याचा संपर्क एक प्रकारे तुटलेला आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातून जाणाऱ्या मार्गांपैकी कोल्हापूर आणि पुणे असे दोन मार्ग वगळता अन्य कुठल्याही मार्गावरून पंढरपुरातून बाहेर न पडता येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक प्रकारे या पुराच्या पाण्याने पंढरपूर शहराला विळखा घातलेला आहे.
पंढरपूरातही पूर स्थिती, सोलापूरसह मराठवाड्याशी संपर्क तुटला
उजनी आणि वीर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात चंद्रभागेच्या पात्रात आल्याने पंढरपूर आणि मराठवाड्याचा संपर्क एक प्रकारे तुटलेला आहे.
अहिल्या चौक आणि नवीन पूल या ठिकाणी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून सर्व ठिकाणची वाहतूक रोखलेली आहे. नागरिक, कोणत्याही वाहनधारकांना पंढरपूरच्या या पुलावरून प्रवास करू दिला जात नाही. चंद्रभागेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत.
ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील नागरिकांनी नदीपात्राकाठी मोठी गर्दी केलेली आहे. त्यामुळे नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. तसेच या पाण्याच्या परिसरामध्ये जाऊन सेल्फी घेणे अथवा शूटिंग करणे या सर्व गोष्टींना पोलिसांनी मज्जाव केला आहे.