पंढरपूर (सोलापूर) -देशासह राज्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने उद्रेक केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहे. ग्रामीण भागात योग्य ते उपचार न मिळाल्यामुळे अनेक कोरोना बाधित रुग्णांचे प्राणही जात आहेत. त्यातच निवडणूक आयोगाकडून इतर राज्यांसह पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीनंतर दोन्ही तालुक्यात कोरोनामुळे कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. याचा परिचय सांगोला तालुक्यातील घेरडी गावातील माने कुटुंबाला आला आहे. निवडणुकीची ड्युटी लागल्यामुळे शिक्षक असणारे माने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातच त्यांच्यासह आई, वडील आणि मावशी या चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शिक्षक असणाऱ्या माने यांच्यासह चौघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रस्थापित पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या हजारोंची गर्दी असणाऱ्या सभा पार पडल्या. त्यानंतर दोन मे रोजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या पोटनिवडणुकीत इलेक्शन ड्युटीसाठी सांगोला तालुक्यातील घेरडी गावाचे शिक्षक प्रमोद माने यांची निवडणूक कामावर नियुक्ती करण्यात आली. दोन मे रोजी ड्यूटी संपवून शिक्षक प्रमोद माने घरी गेले. त्यानंतर त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे सांगोला येथे प्रथमदर्शी उपचार सुरू केले होते. त्यांच्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, आई, वडील आणि मावशी यांनाही कोरोनाची लागण झाली. सांगोला येथे उपचार घेत असताना त्यांची प्रकृती अधिकच खालावली. पुढील उपचारासाठी मुंबई येथे डॉक्टर असलेल्या भावामुळे मुंबई येथे हलवण्यात आले. मात्र प्रमोद माने हे कोरोनाचा अखेर बळी ठरले. माने कुटुंबातील चौघांचा बळी गेला आहे.
अख्खे माने कुटुंबच उद्ध्वस्त -
शिक्षक प्रमोद माने यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची पत्नी, मुलगा, वडील, आई, मावशी यांनाही कोरोनाने ग्रासले होते. त्यावेळी पत्नी, मुलगा, आई, वडील व मावशी यांना कोरोना उपचारासाठी सांगोला येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र पत्नी व मुलगा यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली. मात्र प्रमोद माने यांचा मुंबई येथे मृत्यू झाला. त्यानंतर वडील वसंतराव माने, आई शशिकला माने आणि मावशी जया घोरपडे यांचीही कोरोनाशी झुंज अपयशी ठरली.
पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यूचे तांडव -
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम एक महिना घेण्यात आला. यामध्ये कोरोना नियमांचे निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचे पालन होताना दिसले नाही. 17 एप्रिल रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडले. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्यात कोरोनाचा आलेख चढता राहिला आहे. त्यातूनच दोन्ही तालुक्यातील कोरोनाच्या मृत्यूचा तांडव पाहण्यास मिळत आहे. त्यातील अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती कोरोना प्रादुर्भावामुळे बळी ठरले आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडल्याचे दिसून येत आहे.