सोलापूर -आपण सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी उत्सुक आहोत. यंदा गणरायाचे आगमन शुक्रवार 10 सप्टेंबर रोजी होत आहे. श्री गणेश चतुर्थीदिनी पहाटे 4.50 पासून दुपारी 1.50 केव्हाही श्रीगणेशाची मूर्ती प्रतिष्ठापना करावी, असे सोलापुरातील पंचागकर्ते ओंकार दाते सांगितले आहे. ते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलत होते.
पंचांगकर्ते ओंकार दाते 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी गणेश चतुर्थी साजरा केली जाते. पार्थिव गणपती म्हणजेच मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात होते. यंदाच्या वर्षीसुद्धा गणेश आगमनाला किंवा विसर्जनाला कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही, असे प्रशासनाने अगोदरच सूचित केले आहे. कारण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारची नियमावली लागू केली आहे.
शुद्ध चतुर्थी हा एकच स्थापना दिवस -
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शुद्ध चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही तर पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येत नाही. एखाद्या वर्षी काही कारणाने लोप झाल्यास पुन्हा पुढील वर्षी गणपती पूजन करता येते.
हेही वाचा -बाप्पाचं मुखदर्शन यंदाही नाही; नविन नियमावलीत ऑनलाईन माध्यमांद्वारेच दर्शनाला परवानगी
सर्वसाधारणपणे 8 ते 15 इंच गणेशमूर्ती असणे अपेक्षित -
गणेश चतुर्थीच्या अगोदर म्हणजे 8 ते 15 दिवस अगोदर श्रीगणेशाची मूर्ती आणून ठेवले तरी चालेल, अशी माहिती पंचांगकर्ते ओंकार दाते यांनी सांगितले. श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी किंवा आदल्या दिवशी मूर्ती आणावयास पाहिजे असे नाही. प्रात:कालपासून मध्यान्हपर्यंत कोणत्याही वेळी स्थापना व पूजा करता येईल. घरी स्थापन केली जाणारी श्रीगणेशाची मूर्ती ही 8 ते 15 इंच पर्यंत असणे ठीक राहील. कारण अधिक मोठी मूर्ती असल्यास त्याला इजा होण्याची किंवा भग्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गणेशोत्सवावर कोरोना महामारीचे संकट -
गेल्या वर्षीदेखील गणेशोत्सव कोरोना महामारीच्या सावटाखाली गेला होता. यंदादेखील तीच परिस्थिती आहे. श्रींच्या आगमनावेळी आणि विसर्जनवेळी कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही, असे सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने नुकतेच जाहीर केले आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या जल्लोषात कोरोना महामारीचे विघ्न आले आहे. ज्या मूर्तीचा पाण्यामध्ये पटकन विघटन होईल, अशा श्रींच्या मूर्ती घ्याव्या, असे आवाहन ओंकार दाते यांनी केले आहे.