पंढरपूर(सोलापूर) -कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला. ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमावावे लागले. त्यानंतर राज्यात ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प उभारण्यासाठी प्राध्यान देण्यात आले. त्याचप्रमाणेज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. याबाबत आमदार प्रशांत परिचारक यांनी माहिती दिली आहे.
स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. 'सुपंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प' असे या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष वसंत नाना देशमुख, कारखान्याचे कार्यकारी अधिकारी यशवंत कुलकर्णी, युवा नेते रोहन परिचारक, प्रणव परिचारक यांच्यासह असंख्य सभासद व संचालक उपस्थित होते.