सोलापूर -कोरोना महामारीने महाराष्ट्र राज्यात थैमान घातले आहे. फुफ्फुसांवर परिणाम झाल्याने प्रत्येक रुग्णाला ऑक्सिजन द्यावे लागत आहे. मार्च ते एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने ऑक्सिजनचा देखील तुटवडा निर्माण झाला. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन हे आपल्या पातळीवर जिल्ह्यातील रुग्णांसाठी ऑक्सिजन प्राप्त करण्यासाठी कसरत करताना दिसत आहे. अशात आज ओरिसा येथून 93.38 मेट्रिक टन प्राण वायू घेऊन ऑक्सिजन एक्सप्रेस सोलापुरात आली. यामधून सोलापूर जिल्ह्यासाठी 26 मेट्रिक टन प्राणवायू घेण्यात आले आणि बाकीचे ऑक्सिजन इतर जिल्ह्यांना वाटप करण्यात आले.
हेही वाचा -बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करत प्रहार संघटनेने जपली माणुसकी
अंगुल (ओरिसा) येथून 36 तासांत ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल
ओरिसा राज्यामधील अंगुल जिल्ह्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस 18 मे रोजी सोलापूरकडे निघाली होती. यासाठी केंद्र सरकार व रेल्वे प्रशासनाने ऑक्सिजन एक्सप्रेस विना अडथळा रवाना करण्यासाठी अंगुल (ओरिसा) ते सोलापूर (महाराष्ट्र) असे ग्रीन कॉरिडॉर निर्माण केले होते. तब्बल 36 तासांच्या प्रवासानंतर आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील बाळे रेल्वे स्थानकावर ही एक्सप्रेस दाखल झाली. एक्सप्रेस येण्याअगोदर सहाही जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी सोलापुरात आले होते.