सोलापूर- जिल्ह्यातून 27 हजार 735 व्यक्तींना परराज्यात जाण्याची परवानगी मागितली होती. त्यापैकी आजपर्यंत 20 हजार 466 परप्रांतीय हे त्यांच्या राज्यात रवाना झाले आहेत, तर उर्वरीत 7269 परप्रांतीयांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठीचे नियोजन कऱण्यात आले आहे. त्या राज्यांकडून परवानगी मिळाली की सोलापुरातून रेल्वेद्वारे हे परप्रांतीय पाठविण्यात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून परराज्यात जाण्यासाठी एकूण 27 हजार 735 लोकांनी ऑनलाईन अर्ज सादर केला होता. यामध्ये सोलापूर पोलीस आयूक्तालयाच्या हद्दीतील 13 हजार 436 तर सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीतील 11 हजार 277 जणांचा समावेश होता. यापैकी 20 हजार 466 व्यक्तींना त्यांच्या राज्यात रवानगी करण्यात आली आहे. तर 7 हजार 269 व्यक्ती शिल्लक आहेत. त्यांची जाण्याची व्यवस्था कऱण्यात आली असून त्या सर्वांना रेल्वेने सोडण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नियोजन पुढीलप्रमाणे आहे -
दिनांक 9 मे रोजी पंढरपूर रेल्वे स्टेशऩवरून तामिळनाडुसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती. यामध्ये 981 जणांना पाठविण्यात आले आहेत.
दिनांक 14 मे रोजी कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी रेल्वे सोडण्यात आली. यामध्ये एकूण 1236 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.
दिनांक 17 मे रोजी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून लखनौसाठी रेल्वे श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती. त्या रेल्वेमध्ये 1146 लोकांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे.