सोलापूर -आज देखील विविध समाजातील महिलांना अनेक अघोरी प्रथांना सामोरे जावे लागते. अशाच प्रकारचा एक गुन्हा अंधश्रद्धेतून घडला आहे. चारित्र्य शुद्ध असल्याचे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला तिच्या पतीने उकळत्या तेलातून पाच रुपयांचे नाणे बाहेर काढायला लावले आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर या प्रकारणी पीडितेने गंभीर खुलासा केला आहे. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथील असून सोलापूरमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे.
पारधी समाजातील एका पुरुषाला पोलीसांचा सततचा त्रास होता. पोलिसांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला त्याच्या पत्नीने विरोध केला होता. पतीला न नेण्याची विनवणी केली. याचा गैरफायदा घेत पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र यानंतर पतीने देखील तिच्यावर संशय घेत तिला उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढायला लावून तिचे चारित्र्य सिद्ध करायला लावले. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पतीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर वायरल केला. पारधी समाजातील काही समाजसेवकांनी त्या महिलेचा शोध घेऊन तिला सोलापुरात आणले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे याबाबत माहिती दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तात्काळ दखल घेत सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे तक्रार केली.
पारधी समाजात आजही अघोरी प्रथा
परांडा येथील एका महिलेला तिचे चारित्र्य शुद्ध कि नाही हे सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून नाणे बाहेर काढण्यासाठी तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. यावेळी जर नाणे बाहेर काढताना तिचे हात भाजले तर ती अशुद्ध आणि हाथ भाजले नाही तर ती शुद्ध असल्याचे मानणार. हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळी तिने उकळत्या पाण्यात हात घातला त्यावेळी तिचे हात भाजले. त्यामुळे तिला असंख्य वेदनांना सामोरे जावे लागले.