पंढरपूर - पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी सोहळा साध्या पद्धतीने होणार आहे. येत्या 20 जुलैला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा पार पडणार आहे. मात्र त्यांच्यासोबत महापूजेचा मान मानाचा वारकरी म्हणून विणेकरी यांना उपस्थित राहण्याचा मान मिळणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे..
विठ्ठल मंदिरातील चार पैकी एका विणेकऱ्याला मान मिळणार -
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोरोना पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे आषाढी एकादशी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे आषाढी यात्रा ही भरू शकली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून विणेकाऱ्यांना संधी दिली जाते. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेची सेवा विणेकरी देत असतात. दिवस-रात्र विणेची सेवा देण्यासाठी चार विणेकरी विठ्ठलाच्या सेवेत असतात. यापैकी एकाला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान दिला जाणार आहे.