पंढरपूर (सोलापूर)-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असला तरीही राज्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांनी या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. दरम्यान, या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या एक दिवसीय दौऱ्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात तब्बल सात प्रचार सभा घेणार आहेत.
भाजप व महाविकास आघाडीमध्ये चुरस...
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. त्यात भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे यांना तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चार एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी माजी मंत्री बाळा भेगडे, खासदार रणजितसिंह निंबाळकर नाईक, आमदार गोपीचंद पडळकर हे मतदारसंघ पिंजून काढत आहेत, तर त्यांच्या मदतीसाठी राज्यातील वरिष्ठ नेतेही सभा घेत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या सात सभेचे आयोजन..
भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारात गती आणण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दौऱ्यावर आहेत. ते पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात सात ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामध्ये फडणवीस हे सकाळी नऊ वाजता बोराळी येथे सभेचे सभेचा शुभारंभ करणार आहेत. त्यानंतर दहा वाजता नंदेश्वर, अकरा वाजता डोंगरगाव, बारा वाजेपर्यंत मंगळवेढा शहरातील आठवडा बाजार येथे सभेचे आयोजन आहे. दुपारच्या सत्रामध्ये फडणवीस हे पंढरपूर तालुक्यातील कासेगाव व गादेगाव येथे सभेतून विरोधकांवर निशाणा साधतील. सायंकाळी चार वाजता पंढरपूर येथील टिळक स्मारक भवनात सभेचा शेवट करणार आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देणार का? ते पाहण्यासारखे असणार आहे.
प्रचारात राष्ट्रवादीची महाआघाडी-
राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये राजकीय कौशल्य वापरत प्रचारात आघाडी घेतली, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच जोर लावला आहे. त्यांच्या मदतीला संजय मामा शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्यासह राज्यातील दिग्गज नेत्यांनी मतांचा जोगवा मागितला आहे.
त्यावेळी भारत भालकेंचा फडणवीस यांना होता विरोध-
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा संघटनांनी याआधी फडणवीस मुख्यमंत्री असताना विठ्ठलाची पूजा करण्यास रोखले होते. त्यावेळी दिवंगत आमदार भारत भालके यांनी देखील मराठा संघटनांस पाठिंबा देत फडणवीसांना विरोध केला होता. आता फडणवीस भारत नाना भालके यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार करण्यासाठी पंढरपूरमध्ये येत आहेत.