सोलापूर- शहराचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची प्रसि्द्ध गड्डा यात्रा तोंडावर आली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रा होणार नाही याबाबत अद्याप संभ्रम काय आहे. त्यातच यात्रेच्या आयोजन करण्यावरून राजकीय कुरघोड्या पाहायला मिळत आहेत. त्यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सिद्धेश्वर यात्रा ही पारंपरिक पद्धतीने सोलापुरात गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केली जात आहे. यंदा देखील कोरोना बाबतीत दिलेल्या नियमावलीत ही यात्रा पार पाडावी, यामध्ये राजकीय बाबी आणू नये असे मत व्यक्त करत राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला आहे.
सिद्धेश्वर यात्रेसाठी राजकीय कुरघोड्या करण्यापेक्षा मधला मार्ग काढावा कोरोना नियमावलींचा फज्जा-
भाजपाचे जिल्हा प्रमुख शहाजी पवार यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी फडणवीस सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी सिद्धेश्वर यात्रेबाबत आपले मत व्यक्त केले. दरम्यान या विवाह सोहळ्यात अनेक मातब्बर राजकीय नेते मंडळीनी हजेरी लावली होती. अत्यंत शाही थाटात पार पडलेल्या या सोहळ्यात मात्र, कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक नियमावली विवाह स्थळाबाहेरच सोडली होती काय असे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळाले. या लग्न सोहळ्यात वऱ्हाडी पेक्षा राजकीय नेते आणि कार्यकर्ते अधिक प्रमाणात आले होते. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडाला होता. कोणालाही गर्दीचा भान राहिले नव्हते. यावेळी खूप कमी नागरिकांनी मास्क परिधान केल्याचे चित्र दिसून आले.
दिवंगत नेते भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट -
पंढरपूर येथील दिवंगत नेते भारत भालके यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन फडणवीस लग्न सोहळ्यात सोलापुरात हजर होते. दिवंगत नेते भारत भालके यांच्या मुलाला आमदारकीसाठी भाजप कडून तिकीट देणार का? यावर भाष्य करताना , सद्यस्थितीत त्याबद्दल बोलणे असंवेदनशील ठरेल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.