सोलापूर - जिल्ह्यात 58 ठिकाणी निवारागृह उभारण्यात येत असून यामध्ये 9 हजार कामगारांना रहाण्याची व जेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी सोलापूर कोरोना प्रतिबंधासाठीच्या लॉकडाऊनमुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील कामगारांसाठी निवारागृह सुरू करण्यात आले आहेत. कामगारांना अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल सुविधा स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणार आहेत. निवारागृहाची सुविधा ही नियोजनबद्ध व्हावे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षेतेखाली जिल्हा स्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. यासाठी उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी आणि उपजिल्हाधिकारी दिपक शिंदे जिल्ह्यासाठी तर महापालिका क्षेत्रासाठी नगर अभियंता संदीप कारंजे यांची समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
कामगारांना दिलासा, निवास व भोजन व्यवस्थेसाठी निवारागृह उभारणार याचप्रमाणे प्रत्येक तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षेतेखाली तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, उपजिल्हाधिकारी शैलेश सुर्यवंशी, दिपक शिंदे, जिल्हाप्रशासन अधिकारी पंकज जावळे, जिल्हाउपनिबंधक कुंदन भोळे, प्रादेशिक साखर सहसंचालक दराडे, सहायक कामगार आयुक्त निलेश यलगुंडे यांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील समितीचे सदस्य सचिव आहेत.
कामगारांना दिलासा, निवास व भोजन व्यवस्थेसाठी निवारागृह उभारणार दोन्ही समितीने स्वयंसेवी, धर्मादाय, सहकारी, खासगी आदी संस्थांकडून मदत घेवून कामगारांना अन्न व धान्य उपलब्ध करुन द्यावे. त्याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनवर्सरन विभागामार्फत मिळालेल्या निधीतून मागणी पूर्ण करण्यासाठी नियोजन करणे. विस्थापित मजुरांसाठी निवारागृहाची व्यवस्था करावी यासाठी जिल्हा परिषद नगरपालिका यांच्या शाळा, महाविद्यालय, समाजमंदीर, मंगल कार्यालय निश्चित करावीत. या ठिकाणी कम्युनिटी किचनच्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. आवश्यकतेनुसार आरोग्य सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.