सोलापूर- बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे एसआरपीएफ जवानाने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झाले आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री पाउणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. वैराग पोलिसांनी जवान गोरोबा तुकाराम महात्मे याला अटक केली आहे. नितीन भोसेकर (रा.सापनई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद), असे मृताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, संशयीत आरोपी गोरोबा महात्मे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करत होता. त्यामुळे त्याचा मेहुणा व दोन मित्र भांडण मिटवण्यासाठी आले होते. पण, त्यावेळी भांडण विकोपाला गेले. त्यामुळे गोरोबा याने स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून गोळीबार करण्यास सुरुवात केली. यात नितीन भोसेकर याचा मृत्यू झाला तर गोरोबा यांचा भाऊ बालाजी महात्मे गंभीर जखमी झाला आहे.