सोलापूर- "कशाचं सरकार नं कशाचं काय... वाईट दिवस आहेत. शेतकऱ्याला वाईट दिवस आहेत" हे वाक्य आहेत, 85 वर्षांच्या शेतकरी आजोबांचे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी किती होरपळला जात आहे, हे आजोबा सांगत आहेत. पोरं चांगली आहेत, म्हणून सांभाळतात, नाहीतर भीक मागायची वेळ आली आहे, असे म्हणत अंजनगावच्या गणपत जाधव यांनी दुष्काळाची दाहकता मांडली.
लोकसभा निवडणुकीने तापलेल्या राजकीय वातावरणात राज्यातील भीषण दुष्काळ दिसत जरी नसला, तरी या दुष्काळाचे चटके मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना खोलवर बसत आहेत. दुष्काळात शेतकरी आणि ग्रामीण जनता भरडून निघत आहे.
प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जनावरांची आकडेवारी घेऊन गेले. मात्र प्रत्यक्षात चारा छावण्या सुरू झालेल्या नाहीत. वर्षानुवर्षे कायमच दुष्काळी असलेल्या सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्या सोडल्या, तर सोलापूर जिल्ह्यात इतर कुठेही जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत माढा तालुक्यातील अंजनगाव येथील 85 वर्षे वयाचे गणपतराव जाधव हे दुष्काळाबद्दल त्यांची भावना व्यक्त करताना म्हणतात की "वाईट दिवस आहेत, शेतकऱ्यांना, फार वाईट दिवस आहेत. शहरातील नोकरदारांना नियमित पगार मिळतो. मात्र शेतकऱ्यांनी दुष्काळात करायचं काय ? दोन एकर शेतात आठ 8 पायल्या ज्वारी आणि दोनशे पेंढी कडबा झाला. इतक्यात खायचं काय यायचं काय, हाच मोठा प्रश्न आहे. कशाच सरकार अन् कशाचं काय, आम्ही जुनी माणसं आहोत, आमचा भरोसा हा मेघराजावरच आहे. नाही तर सरकारची मदत पुढारी आणि इतर लोकच गडप करतात. बँकाचे हेलपाटे मारूनही हातात काही मिळत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गणपतराव जाधव 85 वर्षाचे असून यापूर्वीही दुष्काळाचे चटके त्यांनी सोसले आहेत. मात्र पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची उपलब्धता होती. मात्र यावर्षी दुष्काळात पाण्याचीच मोठी अडचण झाल्याचे गणपतराव जाधव सांगतात. यापूर्वीच्या दुष्काळात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे काही प्रमाणात जनावरांना चारा मिळायचा. मात्र चालू वर्षीच्या दुष्काळात पाणीही नाही आणि चाराही नाही, अशी वाईट परिस्थिती यापूर्वी पाहिली नसल्याचे जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.