सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 5 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत परीक्षा घेणार आहे. विद्यापीठाने अंतिम वर्ष, एटीकेटी आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षेची तयारी केली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. ऑफलाइन परीक्षेसाठी शहरातील तीन केंद्रांवर तर, ग्रामीण भागातील 16 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सी.ए. श्रेणीक शहा यांनी ही माहिती दिली.
कोणत्या परीक्षा केंद्रांवर, कोणत्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे, याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटरवर उपलब्ध आहे. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडेही ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ऑफलाइन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी त्या-त्या केंद्रावर जाऊन परीक्षा द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परीक्षेसंदर्भात विद्यापीठाकडे ज्या विद्यार्थ्यांनी संमतीपत्र भरून दिलेले नाही अथवा ऑफलाइन परीक्षा देण्यास संमती दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना www.pahsu.org या वेबसाईटवर जाऊन तेथे आपला पीआरएन नंबर टाकून forgot password हा पर्याय निवडायचा आहे. त्यांना मोबाईलवर पासवर्ड प्राप्त होईल. त्यानुसार त्याचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल, अशी माहिती शहा यांनी दिली.