बार्शी (सोलापूर) - सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी समाजातर्फे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. शिवाय विरोधकांनीही राज्य सरकारला धारेवर धरलेले आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले होते. तर मंगळवारी भटक्या विमुक्त जमातीमधील बांधवानी रास्तारोको केला होता.
आजी-माजी आमदार आंदोलनात सहभागी -
राजकीय आरक्षण रद्द झाल्याने समाजावर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होते आहे. त्याच अनुषंगाने आता विरोधकांनीही राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. बार्शी येथील पोस्ट चौकात झालेल्या आंदोलनात माजी मंत्री दिलीप सोपल तसेच आमदार राजेंद्र राऊत यांचीही उपस्थिती होती. यावेळी आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ओबीसी समाजाकडून शांतपणे आंदोलने केली जात आहेत. भविष्यात आरक्षणाचा तिढा वेळेत नाही सुटला, तर आंदोलन अधिक तीव्र करणारा असल्याचा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष नितीन भोसले यांनी दिला आहे.
हेही वाचा -राज्यात पावसाची शक्यता; कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुढील ४८ तासांत समाधानकारक पाऊस