पंढरपूर (सोलापूर) -संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. मात्र,पंढरपूर तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात बसलेले चिंचणी या गावात कोरोनाने शिरकाव केलेला नाही. चिंचणी गावातील गावकऱ्याच्या एकजुटीमुळे कोरोनाचा शिरकाव केलेला नाही. कोरोना परिस्थितीमध्ये राज्यातील ग्रामीण भागासाठी चिंचणी गाव रोल मॉडेल ठरत आहे.
कोरोनाच्या उद्रेकातही 'या' गावात आढळला नाही एकही कोरोनाग्रस्त चिंचणी गावाची आदर्शवत आरोग्य संपदा
पंढरपूर शहरापासून वीस किलोमीटरच्या अंतरावर चिंचणी गाव आहे. चिंचणी गावात पाचशे ते सहाशे लोकवस्ती आहे. चिंचणी गावचा मूळ व्यवसाय हा शेतीवर आधारित आहे. त्यामुळे चिंचणी गावाला निसर्गाची मोठी नैसर्गिक संपदा लाभली आहे. गावातील प्रत्येक उपक्रमामध्ये नागरिकांचा उत्साही सहभाग असतो. कोरोना पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये गावकऱ्यांनी आरोग्याच्या बाबत पूर्ण दक्षता घेतल्याचे गावकऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामध्ये आरोग्याची प्रत्येक पुरुष व महिलांनी योग्य ती काळजी घेणे, लहान मुलांना आरोग्य संदर्भात जागृत करणे, घराशेजारील परिसराची स्वच्छता ठेवणे, घराबाहेर न पडणे, शेतीच्या कामाहून आल्यानंतर आंघोळ करणे, बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तीला कोरोना नियमांची पूर्ण माहिती देणे. यामुळे या गावात कोरोनाने अद्यापही शिरकाव केला नाही. त्यामुळे हे गाव आरोग्य संपन्न असल्याचे दिसून येत आहे.
निसर्गाच्या सानिध्यात असलेले चिंचणी गाव
चिंचणी गाव हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे. या गावांमध्ये मुबलक प्रमाणात वृक्षसंपदा आहे. त्यामुळे गावातील वातावरण हे ऑक्सीजनरहित असल्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते. दिवसभरातील शेतीच्या कामातून आल्यानंतर ग्रामस्थ एकत्र येऊन ग्रामस्तरावर चर्चा केली. सर्व एकजुटीने घेतल्याचे निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळेच आरोग्याबाबत जनजागृती व लोकसहभागातून निर्णय घेऊन कोरोनाला चिंचणीच्या वेशीवर रोखण्यात आतापर्यंत यश आले आहे. गावातील गावकऱ्यांना लागणारा वस्तूंचा पुरवठा दोन दुकानाच्या माध्यमातून केला जातो. त्यामध्ये कोरोना बाबतीत सर्व नियमांचे पालन केले जाते. गावातील नागरिकांना कोरोना कोणताही फरक पडल्याचे दिसून येत नाही.
चिंचणी गावातील महिलांची कोरोनाबाबत जनजागृती
चिंचणी गावांमध्ये महिलांचा सहभागही पुरुषांच्या बरोबरीने आहे. त्यामध्ये ग्राम स्तरावरील बैठकीमध्ये महिलांना विशेष स्थान दिले जाते. त्यातूनच महिलांच्या आरोग्य संदर्भातील असणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यात मदत होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्यामध्ये महिलांना कोरोनाबाबत असणाऱ्या सर्व बाबींची माहिती करून देण्यात आली. त्यामुळे चिंचणी गावच्या प्रत्येक घरातील महिला आपल्या कुटुंबातील सदस्याची आरोग्याबाबत योग्य ती काळजी घेत आहेत. घरातील सदस्यांना योग्य वेळी घरगुती उपाय करून देणे, लहान मुलांची विशेष काळजी घेणे, बाहेर पडल्यानंतर सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे अशामुळे महिलांनीही कोरोनावर मात करण्यासाठी हातभार आहे.
हेही वाचा -आम्हाला मदत किंवा भिक नको, भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मरू, विडी कामारांची व्यथा