महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्हा मंत्रिपदापासून वंचित, तीन-सहावेळा निवडून आलेल्या आमदारांनाही डावलले - प्रणिती शिंदे

एकेकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पदे एकट्या सोलापूर जिल्ह्यात होती. पण, यंदा महाविकास आघाडीच्या सत्तेत सोलापूरला एकही मंत्रीपद मिळाले नाही.

संपादीत छायाचित्र
संपादीत छायाचित्र

By

Published : Dec 30, 2019, 2:39 PM IST

सोलापूर- राज्याच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्याचा कायमच वरचष्मा राहिलेला आहे. एकेकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पदे एकट्या सोलापूर जिल्ह्यात होती. तर मागील चाळीस वर्षात प्रत्येक मंत्रिमंडळात सोलापूरचे प्रतिनिधित्व होते. मात्र, या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्हा हा मंत्रिपदापासून वंचित राहिलेला आहे.

माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे हे सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहे, तर पंढरपूरचे आमदार भारत भालके हे पूर्वी काँग्रेसच्या तिकीटावर दोन वेळा आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून येत हॅट्ट्रीक साधली. राष्ट्रवादीतील दिग्गज नेते राष्ट्रवादी सोडून जात असताना भारत भालके हे एकमेव विद्यमान आमदार होते. ज्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सहा वेळा निवडून आलेले बबनराव शिंदे आणि तिसऱ्यांदा निवडून आलेले भारत भालके यांच्यापैकी एकाला राष्ट्रवादीकडून मंत्री पदावर वर्णी लागेल, असे वाटत होते. मात्र, राष्ट्रवादीकडून दोघांनाही संधी देण्यात आलेली नाही.

दूसरीकडे काँग्रेसकडून प्रणिती शिंदे या तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. प्रणिती शिंदे यांनी त्यांनी केलेल्या कामाच्या भरवशावर विजय मिळविलेला आहे. काँग्रेसकडे मंत्रिपदाची संख्या कमी असल्यामुळे प्रणिती शिंदे यांना संधी मिळालेली दिसत नाही, तर प्रणिती शिंदे यांच्यासोबतच राजकारणात प्रवेश केलेल्या लातूरच्या अमित देशमुख यांना मात्र कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

युती सरकारच्या शिवसेनेकडून तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली होती. तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा विधानसभा मतदार संघातून निवडून आले असले तरी ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना देखील डावलण्यात आले आहे.

सोलापूर जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या सोलापूर जिल्ह्यावर सुरुवातीच्या काळात काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख होती. कायम सोलापूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्यातील एकालाही मंत्री म्हणून संधी मिळालेली नाही.

हेही वाचा - 'प्रणिती शिंदेंना मंत्रिपद मिळाले तर आनंदच'

ABOUT THE AUTHOR

...view details