सोलापूर- सोलापुरात कोरोनाचे संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या 32 रुग्णांपैकी 25 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत. तर उर्वरित 7 जणांचे अहवाल अजून यायचे आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचे जिल्हाधिऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात 32 जणांना अॅडमिट करण्यात आले होते. त्यातील 25 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर अद्यापही सात जणांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत.
आतापर्यंत 254 जणांचा होम क्वारंटाइन करण्यात आले असून, यातील 110 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर उर्वरित 144 जण हे निगराणीखाली आहेत. या सर्वांच्या हातावर शिक्का मारण्यात आला आहे. तर विलगीकरण कक्षात 55 जण दाखल असून कालावधी पूर्ण झालेल्या 27 जणांना घरी सोडण्यात आले आहे. 28 जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती ही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच सोलापुरातील लोकांना घरपोच अन्नधान्य पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक विभागासाठी त्या-त्या भागातील सूपर मार्केटचे नंबर देण्यात आले असून त्याच्या माध्यमातून नागरिकांना घरपोच अन्नधान्य पुरविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -धक्कादायक ! कोरोनोचा असाही बळी.. जिल्हाबंदीसाठी खोदला रस्ता, उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू