सोलापूर -कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन अनेकांची वाताहत होत आहे. त्याच प्रमाणे सुखी संसाराची स्वप्न उराशी घेऊन पुण्यात कामासाठी गेलेल्या एका जोडप्याच्या नशिबीही बाका प्रसंग आला. नऊ महिन्याची गर्भवती असलेल्या एका महिलेस पोटात एक जीव घेऊन पुणे ते सोलापूर असा खडतर पायी प्रवास करावा लागला. मात्र सोलापुरात आल्यानंतर त्यांना एका वृत्तपत्र छायाचित्रकाराने सामाजिक बांधिलकी दाखवत मदत केली. त्यांना त्यांनी सोलापूरवरून गुलबर्ग्यासाठी जाणाऱ्या वाहनात बसवून पाठण्यात आले. यशवंत सादूल असे त्या छायाचित्रकाराचे नाव आहे.
मूळचं कर्नाटकातील गुलबर्गा येथील हे जोडप कामधंद्यानिमित्त पुण्यात गेलेलं. पुण्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा असल्यामुळे बाळांतपण हे पुण्यातच करण्याचा निर्णय या जोडप्यानं घेतलेला. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि हे पुण्यातच अडकले. बांळतपणातील नियमित तपासणी केली जात होती, ती दवाखाने बंद आहेत. इतर कोणताही दवाखाना सुरू नाही. त्यामुळे ते चिंताग्रस्त होते.