पंढरपूर (सोलापूर) - नववर्षाच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजत असताना दिसत आहेत. त्यामुळे गावागावात सध्या गरमागरम चर्चा सुरू आहेत. मात्र निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीत सोलापुरातलं एक गाव असं आहे, जिथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून निवडणूकच लागली नाही. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव टे या गावाने मागील 67 वर्षापासून बिनविरोध निवडून येण्याची परंपरा कायम राखली आहे.
गावात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी निघते विजयी मिरवणूक -
माढा तालुक्यातील निमगाव टे या गावात गेल्या 67 वर्षापासून ग्रामपंचायतीची एकदाही निवडणूक झाली नाही. विशेष म्हणजे गावातील सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन बिनविरोध निवडणुकीची प्रक्रिया पार पडते. ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार गावातले जेष्ठ मंडळी ठरवतात. या प्रत्येक प्रभागातील एक उमेदवार सर्वानुमते ठरवला जातो. तोच उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज भरतो. विरोधात कुठलाही उमेदवारी अर्ज नसल्याने निवडणूक बिनविरोध होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिवसच विजयाच्या मिरवणुकीने समाप्त होतो.
निमगाव टे ग्रामपंचायत दिवंगत विठ्ठलराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाली. या ग्रामपंचायतीमध्ये माढ्याचे आमदार बबन शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या देखरेखीखाली कारभार चालतो. निमगाव या गावची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. या गावात एकूण अकरा प्रभाग आहेत. या गावात जातीनुसार आरक्षणही देण्यात आले आहे. गावातील प्रत्येक सदस्य आरक्षणानुसार दिला जातो. यामुळे गावात एकोप्याचे दर्शन होताना दिसते. या गावगाड्याच्या कारभारामध्ये शिंदे घराण्याची तिसरी पिढी जोमाने काम करत आहे.