महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल दीड वर्षानंतर आमदार तानाजी सावंत पुन्हा सक्रिय - आमदार तानाजी सावंत सोलापूर

सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. काल त्यांनी करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आज ते सोलापुरात पदाधिकारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत.

solapur
सोलापूर

By

Published : May 13, 2021, 4:58 PM IST

पंढरपूर -विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाला सोलापूरचे शिवसेना संपर्कप्रमुख आमदार डॉ. तानाजी सावंत जबाबदार असल्याच्या टीका झाल्या. त्यानंतर तब्बल 19 महिन्यांपासून सोलापूरकडे दुर्लक्ष केलेल्या तानाजी सावंत यांनी 12 मे रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका त्यांनी घेतल्या. त्यामुळे तानाजी सावंत हे तब्बल दीड वर्षानंतर सक्रिय झाल्याचे दिसले.

शिवसेना प्रमुखांच्या आदेशानुसार तानाजी सावंतांचा दौरा

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख डॉ. तानाजी सावंत यांचा बुधवारी आणि गुरुवारी सोलापूर जिल्ह्याचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा तसेच पक्षीय, शासकीय स्तरावर बैठका घेतल्या. त्यांनी बुधवारी पंढरपूर दौऱ्यापासून सुरुवात केली. करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला आणि पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीमध्ये वर्षभर केलेल्या कामाचा आढावा सावंतांनी घेतला.

तानाजी सावंतांकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी

आमदार आणि शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांनी पंढरपूर तालुक्यातील कोरोना संदर्भातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या. त्यावेळी त्यांनी तालुका प्रशासनातील अधिकार्‍यांची चांगलीच खरडपट्टी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मात्र, प्रशासनातील अधिकारी तळागळामध्ये जाऊन काम करत नसल्याचे दिसून येत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. कोरोना साखळी तोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्षमपणे काम करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज तानाजी सावंत सोलापूर दौर्‍यावर

आज (13 मे) सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट तालुक्‍यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. शिवसेना नगरसेवक, शहर पदाधिकारी तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट युवासेना अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यासोबत आज विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोना परिस्थितीचे नियोजन व अडचणी यावर डॉ. सावंत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते उस्मानाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

हेही वाचा -तारापूर औद्योगिक क्षेत्रात भीषण आग, तीन बंब घटनास्थळी दाखल

हेही वाचा -राष्ट्रीय पुरस्कार विजेती "तेंडल्या" चित्रपटाची टीम कर्ज फेडण्यासाठी करतेय शेती

ABOUT THE AUTHOR

...view details