सोलापूर - सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आज (3 मे) नवीन 1777 जणांना कोरोना झाला आहे. तर 38 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून सोलापुरात कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी किंवा ब्रेक द चैन अंतर्गत कोरोना नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याची कडक अंमलबजावणी स्थानिक प्रशासन करत आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे.
सोलापूर शहरात आज 121 जण पॉझिटिव्ह, 398 कोरोनामुक्त
सोलापूर शहरात कोरोना विषाणूची लाट ओसरताना दिसत आहे. कारण आज रुग्णांपेक्षा बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सोलापूर शहरात आज नवीन 121 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 1579 जणांची तपासणी करण्यात आली होती. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 73 पुरुष, तर 48 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आज 11 रूग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या मृतांमध्ये 6 पुरुष आणि 5 स्त्रिया आहेत. सोलापूर शहरात आज 398 रुग्ण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सोलापूर शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर शहरात आजही 2388 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहे.