सोलापूर -जिल्ह्यात दररोज 900 ते 1000 रुग्ण नव्याने आढळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर स्थानिक प्रशासनाने विविध उपाययोजना करून 5 एप्रिलपासून कडक नियमावली लागू केली. विकेंड लॉकडाऊन लागू केले होते. यादरम्यान राज्यातील गोरगरीब जनतेसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्यानुसार सोलापूर शहरातील पाचही शिवभोजन केंद्रावर प्रति केंद्र 175 प्रमाणे पाच 875 शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या जात आहेत. पण प्रत्येक केंद्रावर आज ही अनेक नागरिकांना उपाशी पोटी परत जावे लागत आहे. उपलब्ध थळ्यांची संख्या कमी पडू लागली आहे. पोटाची आग विझविण्यासाठी गोरगरीब येणारे लोक अधिक आहेत. त्यामुळे शिवभोजन जेवण कमी पडू लागले आहे. प्रत्येक केंद्राला कमीत कमी 200 ते 250 इतक्या थाळ्या दिल्या, तर सर्वांना मोफत पोटभर जेवण मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त केली.
सोलापुरात पाच ठिकाणी शिवभोजन -
राज्य शासनाने गोरगरीब व भुकेल्या नागरिकांसाठी लॉकडाऊन काळात मोफत शिवभोजन थाळी किंवा जेवणाची व्यवस्था केली आहे. सोलापूर शहरात बसस्थानक परिसरात 2 केंद्र, मार्केट यार्डमध्ये 1 केंद्र, अश्विनी रुग्णालय परिसरात 1 केंद्र, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 1 केंद्र असे पाच केंद्र आहेत. या केंद्रावर 175 जणांना मोफत शिवभोजन दिले जाते. एकूण सोलापूर शहरातील पाचही केंद्रावर 875 जणांना शिवभोजन दिले जाते. मात्र, भुकेने व्याकुळ झालेल्या गोरगरिबांची संख्या मात्र हजारांत आहे.