सोलापूर: सोलापुरातील राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकला आहे. ज्योतिबा गुंड यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, सोलापूर राष्ट्रवादीमधील पदाधिकारी व पक्ष निरीक्षक यांच्या कामकाजाला किंवा मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादी सोडून जात असल्याची खंत व्यक्त केली. अजित पवारांच्या स्वागताला जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करून हार तुऱ्यांचा बंदोबस्त केला. शहर भर बॅनर लावले, मोठी जय्यत तयारी केली होती. पण वरीष्ठ नेत्यांना कंटाळून शिंदे गटात प्रवेश करत असल्याची माहिती दिली.
शिंदे गटात प्रवेश : अजित पवार व जयंत पाटील हे 1 जून रोजी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. 1 जूनच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्योतीबा गुंड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे. ज्योतिबा गुंड यांनी पक्ष सोडताना पक्षातील विविध नेत्यांच्या कामकाजावर नाराजगी व्यक्त केली. राष्ट्रवादी मधील अंतर्गत वाद चहावाट्यावर आला आहे.
स्थानिक नेत्यांच्या कामकाजावर नाराजी: यापूर्वी राष्ट्रवादी मधील दिग्गज नेते म्हणून ओळख असलेले दिलीप कोल्हे यांनी पक्ष निरीक्षक, शहर अध्यक्ष यांवर विविध आरोप करत पक्षाला रामराम ठोकून शिंदे गटात प्रवेश केला होता. आज 31 मे रोजी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादीमधील व्यसनमुक्ती सेलचे अध्यक्ष ज्योतिबा गुंड यांनी, शहर अध्यक्ष व पक्ष निरीक्षक यांवर विविध आरोप करत शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश कार्यक्रमात शिंदे गट शिवसेनेतील विविध नेते उपस्थित होते. राष्ट्रवादीमधील सोलापूरचे पक्षनिरीक्षक हे सोलापूरच्या राष्ट्रवादी पक्षाकडे जातीने लक्ष देत नाहीत, असा आरोप ज्योतिबा गुंड यांनी करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.