पंढरपूर :राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेशकरणार आहेत. 27 जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या बीआरएस प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार आहे. मागील महिन्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली होती. तेव्हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यादरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी अभिजीत पाटील यांना राष्ट्रवादीकडून विधानसभेची उमेदवार देण्याचे संकेत शरद पवार यांच्याकडून देण्यात आले होते. तेव्हापासून पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीमध्ये दुफळी निर्माण झाली होती.
चंद्रशेखर राव भगीरथ भालकेंची गुप्त भेट : गेल्या काही दिवसांपासून भगीरथ भालके यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची त्यांच्या कुटुंबासह तेलंगणात भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. भगीरथ भालके यांनी तेलंगणाला जाण्यासाठी पुण्याहून विमानाची खास व्यवस्था केली होती. के. चंद्रशेखर राव यांनी भगीरथ भालके यांना पक्षात येण्याचे संकेत दिले असता, कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे भालके यांनी सांगितले होते. मध्यंतरी पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांच्या चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होती. त्या निवडणुकीत चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत नेते भगीरथ भालके हे स्टार प्रचारक होते. या निवडणुकीत कल्याणराव काळे यांचे संपूर्ण पॅनल सोळाशे मतांनी विजयी झाले होते.