सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस कडून घड्याळ या पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरून निवडणूक लढवित असलेल्या दोन उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलाच झटका दिला आहे. सुरुवातीला पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आणि आता या दोघांचीही उमेदवारी रद्द समजून इतरांना पाठिंबा देण्याचा आदेशच पक्षाने काढला आहे.
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारी जिल्हाध्यक्ष सांगोला विधानसभेसाठी शेकापला तर करमाळ्यात अपक्ष असलेल्या संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. करमाळा मतदारसंघातून संजय पाटील घाटणेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. या दोघांची उमेदवारी रद्द समजून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सांगोल्यात शेकापचा तर करमाळ्यात संजय शिंदे यांचा प्रचार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील-घाटणेकर यांना अगोदरच जाहीर झालेली उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय मामा शिंदे यांना त्यांच्या "सफरचंद" या चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पाठिंबा जाहीर केलेला आहे. संजय मामा शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असतील अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने मोहोळ, पंढरपूर, माळशिरस आणि बार्शी या विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर अधिकृतपणे उमेदवार उभे आहेत. करमाळा आणि सांगोला या ठिकाणच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झाला होता. त्या संदर्भामध्ये पक्षाच्यावतीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये एबी फॉर्म देऊन संजय पाटील यांना अगोदरच जाहीर झालेली उमेदवारी पक्षाच्या पातळीवर रद्द करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असलेले संजय मामा शिंदे यांना त्यांच्या "सफरचंद " या चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे संजय मामा शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरस्कृत उमेदवार असतील.
सांगोला मतदारसंघामध्येसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अजितदादांनी सांगोला आणि करमाळा दोन्हीच्या बाबतीमध्ये खुलासा केलेला आहे. सांगोलामध्ये शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सर्वांच्यावतीने हा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात आलेला होता. मध्यंतरी पक्षाच्या पातळीवर मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक आबा साळुंखे -पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना त्या ठिकाणी एबी फॉर्म उपलब्ध झाला होता. तो अर्ज रद्द करण्यात यावा यासंदर्भातील परिपत्रकही काढण्यात आले होते. परिपत्रक वेळेमध्ये ई-मेल द्वारे संबंधित निवडणूक अधिकारी भोसले यांच्याकडे दाखल देखील करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षासोबत असेल. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातसुद्धा आमदार भारत भालके हेच राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. शिवाजी काळुंगे हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार नाहीत, असा खुलासा काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाने केला आहे. शिवाय त्यांना पक्षातून बडतर्फ केले आहे, असेही पाटील म्हणाले.