मुंबई -आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पंढरपूर मंगळवेढा हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दरम्यान मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्यानंतर, त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी आज राष्ट्रवादीकडून आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मान्यतेने भगीरथ भारत भालके यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. पंढरपूर मतदारसंघातून ते नक्की विजय होतील, असं ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.
कोण आहेत भगीरथ भालके?
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 17 एप्रिल रोजी पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना तिकीट द्यायचे की, त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना तिकीट द्यायचे यावरून संभ्रम होता. अखेर भगीरथ भालके यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. भगीरथ भालके हे विठ्ठल सहकारी कारखान्याचे दहा वर्षांपासून संचालक आहेत.