सोलापूर - संपूर्ण जगात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजला आहे. करमाळा शहरातील बऱ्याच कुटुंबांना या विषाणूमुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशा निराधार व गरीब कुटुंबांना गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेस वेगवेगळी मदत करून आधार देण्याचे काम करत आहे.
करमाळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 200 कुटुंबाना मोफत धान्यवाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या कुटुंबांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मदतीचा हात दिला आहे. या संकटकाळात जवळपास २०० गरजू कुटुंबांना गेल्या २ महिन्यांपासून जमेल त्या प्रकारे मदत करून आधार देत आहेत.
करमाळा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या भागांतील अत्यंत गरीब गरजू असे रिक्षाचालक, आचाऱ्याच्या हाताखालील महिला कामगार, शिवणकाम करणाऱ्या महिला, गवंडीकाम करणाऱ्या महिला, दिवसभर वेगवेगळे काम करून संध्याकाळी आपल्या कुटुंबाचे पोट भरणाऱ्या करमाळा शहरातील जवळपास दोनशे कुटुंबांना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रत्येकी पाच किलो ज्वारी व पाच किलो तांदूळ वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब आहेरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिषेक आव्हाड, अजय जाधव, सुनील वीर, अजय साबळे, विकास गायकवाड, मयूर जाधव, राज केसकर, तेजस ढेरे, केतन कांबळे, समाधान फरतडे, कमलेश भुतकर, अभिषेक शेलार, निलेश भुतकर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.