सोलापूर- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेनुसार महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आज प्रतिज्ञा घेतली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वांना सहकार्य करण्यासह इतर मुद्द्यांचा समावेश आहे.
मी स्वतः माझ्या कुटुंबात व परिसरातील लोकांना मास्क लावणे, आपापसात दोन मीटरचे अंतर ठेवणे व साबणाने वारंवार हात धुणे या सर्व गोष्टीसाठी प्रेरित करणार, कोरोनाच्या काळात कोणाशीही दुर्व्यवहार अथवा भेदभाव न करता सर्वांशी आपुलकीने व सद्भभावनेने वागेन, अशी प्रतिज्ञा सोलापूर मनपाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली.
अशी घेतली मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा-
कोरोनाच्या लढाईत ढाल म्हणून डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचा व सर्व कार्यकर्तांचा सन्मान व समर्थन करण्याचाही प्रतिज्ञेत समावेश आहे. कोरोनाच्या लढाईत सर्वांना सर्वतोपरी सहकार्य करेन, अशी प्रतिज्ञाही यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी मनपा उपायुक्त धनराज पांडे, मुख्य लेखापरीक्षक शिरीष धनवे, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, सहाय्यक आयुक्त श्रीराम पाटील, सहाय्यक आयुक्त सुनील माने, आरोग्य अधिकारी शीतल जाधव, सहाय्यक आयुक्त मनवार यांनी प्रतिज्ञा घेतली. सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी , सामान्य प्रसासन विभागाचे कार्यालय अधीक्षक युवराज गाडेकर, आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी तसेच मनपा अधिकारी यांनीही प्रतिज्ञा घेतली आहे.
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' काय आहे ही मोहीम?
राज्यात 15 सप्टेंबरपासून 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची चौकशी, तपासणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाविरुद्ध लढताना घ्यायची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. राज्यातील जनजीवन सुरळीत होत असतांना कोरोनाची साखळी तोडणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कोरोनासोबत जगणे आपल्याला शिकावे लागणार असून आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच म्हटले आहे.