सोलापूर : Muslim Reservation : सोलापुरातील उर्दू भवनासमोर सोलापूर शहर आणि जिल्हा एमआयएमच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनात एमआयएमचे शहर आणि जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी मुस्लिम आरक्षणाची मागणी केलीय. मुस्लिम समाजाला आरक्षण द्या असे कोर्टाने सांगूनही मुस्लिम समाजाला न्याय मिळत नाही, त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळत नाही, अशा शब्दांत फारूक शाब्दी यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.
आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा : एकीकडे राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण साठी आंदोलन होत आहेत. उपोषणं होत आहेत. राज्य सरकार त्यांची मनधरणी करत आहे. आंदोलन किंवा उपोषण आणि अन्नत्याग केल्याने जर आरक्षण मिळत असेल तर मुस्लिम समाजात सुद्धा वीर आहेत. मुस्लिम समाजातही मनोज जरांगे पाटील आहेत. मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एमआयएमचे सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते अन्न त्याग करून मुस्लिम आरक्षणासाठी उपोषणाला बसतील असा इशारा यावेळी फारूक शाब्दींनी दिलाय.
काँग्रेस नेत्यांवर एमआयएमची सडकून टीका : एमआयएमचे नेते दौला कुमठे यांनी माध्यमांसमोर बोलताना, काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केलीय. सोलापुरात काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचे उदाहरण देत, सोलापुरातील काँग्रेलचे नेते मुस्लिम समाजासाठी झगडण्याऐवजी, नाच गाण्यात मग्न आहेत, अशा शब्दांत एमआयएम नेते दौला कुमठेंनी सडकून टीका केलीय.