पंढरपूर (सोलापूर) - 'आली आली गौराई, सोनरुप्याच्या पावली' गणपतीचे आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचा सणही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. राज्यातील सर्व समाज बांधव समभावाने गणेश उत्सव साजरा करतात. पंढरपुरातील कैठाळी येथील मुस्लिम समाजातील इनामदार कुटुंबीय 22 वर्षापासून भक्तीभवाने गणपती बरोबर गौराईचे घरात आगमन करतात. गौरीच्या आगमनापासून ते गौरी विसर्जनापर्यंत सर्व कार्य इनामदार कुटुंबांकडून परंपरेनुसार केली जाते. यातून हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न इनामदार कुटुंबीयांकडून केला जातो.
22 वर्षापासून नित्यनेमाने गणरायाची प्रतिष्ठापना -
जावेद गुलाब इनामदार हे 22 वर्षापासून नित्यनेमाने गणरायाची प्रतिष्ठापना करून पूजन करतात. यामध्ये इनामदार कुटुंबियातील लहानथोर उत्साहाने सहभाग घेतात. इनामदार कुटुंबीयांकडून आठ दिवस आधीच गणेशोत्सवाची लगबग सुरू होत असते. गणेश उत्सव सण वर्षातून एकदा येत असल्यामुळे परंपरेनुसार कार्य केले जाते.