सोलापूर- हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी चालवतात की मोहन भागवत, असा सवाल खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे. ते सोलापुरात बोलत होते.
केंद्रात सत्तापरिवर्तन झाल्यापासून भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाला हरताळ फासला जात आहे. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम म्हणजेच सीएए कायदा केंद्र सरकारने मंजूर करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. सदर कायद्याला देशभरातील संविधानप्रेमी, विवेकवादी, पुरोगामी परिवर्तनवादी, धर्मनिरपेक्ष संघटना, पक्ष आणि भारतीय नागरिक जन आंदोलनाद्वारे विरोध करीत आहेत. स्वातंत्र्यानंतर ही एक चांगली गोष्ट घडत असल्याचेही दलवाई यांनी सुरुवातीला सांगितले.
याच पार्श्वभूमीवर जमियत उलमा-ए-हिंद पश्चिम महाराष्ट्र आणि सोलापुरातील समविचारी संघटनांच्यावतीने 'संविधान बचाव, देश बचाव' संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाच्या निमित्ताने खासदार हुसेन दलवाई सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संघ परिवार, मोहन भागवत आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली.