सोलापूर-दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोलापूरमध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच सोलापूर- अक्कलकोट राज्य मार्गावर विविध शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. कृषी कायदे मागे घ्यावेत, राज्य सरकारने वीजबिल माफ करावे अशा विविध मागण्या आंदोलकांनी केल्या. चक्काजाम आंदोलनामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सोलापूर- विजापूर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या 75 दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. हे कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र कायदे अजूनही रद्द न झाल्याने, आज याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलापूर - विजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.