पंढरपूर (सोलापूर) -ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांना 248 कोटी 84 लाख रुपयांचा मदत निधी वाटप झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात काही तालुक्यात मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नाही. शिवाय पुरामुळे घर पडलेले व जनावरे मृत्युमुखी झालेल्या नुकसानग्रस्त नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
अतिवृष्टीचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, सांगोला, दक्षिण-उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला होता. ऑक्टोंबर महिन्यात सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोलापूर जिल्हा कृषी विभागाकडून 11 तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. अतिवृष्टीमध्ये 2 लाख 66 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. प्रशासनाकडून मात्र 99 टक्के मदतीचे वाटप झाल्याचा दावा करण्यात आला आहे.