सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाने अक्षरश: थैमान घातला आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी 500 हून अधिक नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये 513 तर महापालिका हद्दीतील 47 अशा एकूण 560 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तसेच ग्रामीणमध्ये 16 तर महापालिका हद्दीतील दोन अशा एकूण 18 रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापुरात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू आणि बाधित रुग्णांची वाढ होण्याचा हा पहिलाच दिवस आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 21 हजार 264 झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या 5 हजार 36 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये महापालिका हद्दीतील 761 तर ग्रामीण भागातील 4 हजार 275 रुग्णांचा समावेश आहे. कोरोना चाचणीचे अद्यापही 193 अहवाल प्रलंबित आहेत. त्यामध्ये ग्रामीणमधील 137 तर महापालिका हद्दीतील 56 अहवालांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील बाधितांची एकूण संख्या 14 हजार 185 तर महापालिका हद्दीतील बाधितांची संख्या 7 हजार 79 झाल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 21 हजार 264 झाली आहे.