पंढरपूर (सोलापूर) - राज्याच्या राजकारणामध्ये अकलूजच्या मोहिते पाटील घराण्याला महत्त्वाचे स्थान आहे. आशियातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीवर विजयसिंह मोहिते-पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे. मात्र, सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील, अशी लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
मोहिते पाटील घराण्याचे अकलूज मॉडेल
अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात सहकार चळवळ निर्माण केली व माजी मुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्याचा पाया घातला. मोहिते-पाटील घराण्यामुळे अकलूज ग्रामपंचायत विकासाचे मॉडेल म्हणून देशात प्रसिद्ध झाले. मात्र, अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोहिते पाटील घराण्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे लहान बंधू मोहिते पाटील घराण्यापासून अलिप्त होते. त्यांनी राजकारणामध्ये वेगळी चूल मांडली. प्रतापसिंह यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. विजय मोहिते पाटील गटाविरुद्ध दंड थोपटले. विजय मोहिते पाटील गटाने भाजपमध्ये प्रवेश केला. ते भाजपवासी झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धवलसिंह यांना विधानसभेच्यावेळी आपल्या बाजूने वळवल्याने माळशिरस विधानसभेला भाजपला अगदी निसटता विजय मिळवत आला होता.
मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील लक्षवेधी लढत
अकलूजची लोकसंख्या तब्बल 40 हजारापेक्षा जास्त असल्याने यावेळी माळशिरस तालुक्यातील अकलूज नगरपालिका, तर नातेपुते, श्रीपुर महाळुंग हे नगरपंचायत करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता. मात्र, महाळुंग ग्रामपंचायत निवडणुकीत एकही अर्ज दाखल झाला नाही, तर अकलूज आणि नातेपुते या ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल झाल्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. मात्र, आधी अकलूज येथील ग्रामपंचायतीवर बहिष्काराची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. मात्र, विरोधकांशी बैठक फिसकटल्याने पुन्हा ही निवडणूक लागली. खरे तर ही साधी ग्रामपंचायतीची निवडणूक असली तरी थेट बारामतीकरांचेही येथील प्रत्येक घडामोडींवर बारीक लक्ष आहे. त्यामुळेच, मोहिते विरुद्ध मोहिते या लढतीचे महत्व वाढले आहे.