पंढरपूर (सोलापूर) -आषाढी वारी सोहळ्यावर राज्य सरकारकडून कठोर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. आषाढी वारी सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी व भाविकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्या भाविकांना व वारकऱ्यांना पंढरीत प्रवेश करण्याची मुभा घ्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी केली आहे.
पंढरपुरातील क्रांती चौक येथे मराठा आरक्षण व राज्यातील स्थानिक संस्थांमधील ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पक्षाकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी ही मागणी केली आहे. यावेळी आमदार समाधान आवताडे व जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर मागील दीड वर्षांपासून बंद आहे. त्यातच गेल्या पाच वारी कोरोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वारी व वारीत येणाऱ्या भक्तांवर अवलंबून असलेल्या व्यापारी, व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे सरकाने या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी आमदार परिचारक यांनी केली आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता राज्य सरकारचे मनमानी कारभार
पंढरपूर हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूर येथील लोकप्रतिनिधी हे पंढरपुरातील विषयासंदर्भात विधान परिषद व विधानसभेत प्रश्न मांडत असतात. मात्र, आषाढी वारीबाबत राज्य सरकारकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारचा विश्वासात घेतले गेले नाही. लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता राज्य सरकारकडून मनमानी कारभार केला जात आहे, आरोप आमदार समाधान आवताडे यांनी केला तर आषाढी वारी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेणार असल्याचेही आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
हेही वाचा -ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन, दोन तास वाहतूक खोळंबली