सोलापूर : कॉंग्रेसने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते- पाटील, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह माजी आमदारांनी जिल्हा निरीक्षकांकडे केली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी देखील सर्वानुमते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस हायकमांडकडे करणार असल्याची माहिती, पत्रकार परिषदेत दिली. माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी देशाला सुशीलकुमार शिंदे यांची गरज असल्यामुळे प्रणिती आणि सुशीलकुमार या दोघांची नावे प्रदेश कार्यालयाकडे पाठवा, असे सांगितले.
2014 पासून शिंदे घराण्याला घरघर : सोलापूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिंदे घराण्याच वर्चस्व आहे. मोदी लाटेत 2014 पासून शिंदे शाहीला घरघर लागली होती. सुशीलकुमार शिंदें यांनी देखील वयोमानानुसार राजकारणातून निवृत्त होणार असे अनेकदा जाहीर केले आहे. लोकसभेच्या निवडणूकीत 2019 साली काँग्रेसला मजबूत उमेदवार न मिळाल्याने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उभे राहावे लागले होते. यंदा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र प्रणिती शिंदे या लोकसभा निवडणूक लढवतील अशी माहिती बसवराज पाटील यांनी दिली.
बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : सोलापूर शहरातील काँग्रेस भवनात सोमवारी सायंकाळी 14 ऑगस्ट रोजी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते निर्णय झाला आणि आगामी सोलापूर लोकसभेची उमेदवारी विद्यमान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना देण्यात येणार असल्याची माहिती, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी, पदाधिकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. याबाबत देशपातळीवर प्रणिती शिंदे यांच्या नावाची शिफारस केली जाणार असल्याची माहिती बसवराज पाटील यांनी दिली.