सोलापूर- कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळी इतर देशातील पंतप्रधान किंवा अध्यक्ष कोरोनाशी लढण्याची तयारी करत होते. ऑक्सीजन असो किंवा व्हेटिलेटर यासाठी धावपळ करत होते. मात्र, आपले पंतप्रधान मोदी दिया जलाओ, थाली बजाओ म्हणत बसले. वृद्ध लोक सांगतात की थाळ्या वाजवले तर अवदसा लागते. पहिल्या लाटेत पंतप्रधानांनी थाळ्या वाजवायला सांगितले. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या वेळी अवदसा आली आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
बोलताना आमदार प्रणिती शिंदे शास्त्री नगर येथील शानदार चौक येथे ईलियास अब्दूल लतीफ शेख यांचे काँग्रेस संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले, चेतन नरोटे, आरिफ शेख, मनोज यलगुलवार, इम्रान खान, अब्दुल लतीफ शेख, शकिल मौलवी, रमेश कैरमकोंडा, रुस्तुम कंपली, रफिक चकोले, जुबेर कुरेशी, मुजाहिद जमादार, मिराभाईंदर येथील नगरसेविका रुबीना फिरोज यांची उपस्थिती होती.
'काँग्रेस पक्ष धर्म निरपेक्ष'
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्व समाजातील स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले. काँग्रेसनेही देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे बलिदान दिले आहे. काँग्रेस सर्व धर्मियांना सोबत घेऊन चालते. महापालिकेत भाजपची सत्ता येण्यापूर्वी सोलापूर शहरता पाणी पुरवठा एक दिवस आड होत होता. पण, भाजपची सत्ता आल्यानंतर सोलापुरात पाच दिवस आड पाणी येत आहे. त्यामुळे भाजप केवळ सत्तेसाठी हपापलेली असून त्यांना त्यांची जागा दाखवून द्या.
'...तर फायदा भाजपला होईल'
आगामी महापालिका निवडणुकीत शास्त्री नगर भागातून जास्तीत जास्त कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. मुस्लिम समाजाकडून भाजपला मते जाणार नाहीत. पण, इतर छोट्या पक्षाला मतदान केले तर अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपला होणार आहे, असेही आमदार शिंदे म्हणाल्या. भाजपला फक्त सत्ता हवी आहे. सत्ता आल्यानंतर ते जनतेला विसरतात. थाळ्या वाजवून अवदसा आणतात, अशी टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा -सोलापूरच्या सहायक पोलीस आयुक्तांचा जीममध्ये व्यायाम करताना मृत्यू