सोलापूर - धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांनी केवळ राजकारण केले असून बहुजनांवर देखील अत्याचार केल्याचा आरोप भाजपाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार हा राज्याला झालेला कोरोना आहे, अशी टीका त्यांनी केली.
'शरद पवार म्हणजे राज्याला झालेला कोरोना'... आमदार गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली! पंढरपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील फडणवीस सरकारने एक हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे केवळ राजकारणासाठी पवारांना धनगर समाज लागतो, असा आरोप त्यांनी केला.
कोकणात वादळी वाऱ्याने झालेले नुकसान पाहण्यासाठी शरद पवारांनी दोरा केला. मात्र त्या ठिकाणच्या लोकांना दमडीचीही मदत मिळाली नाही. त्यामुळे पवारांचे नेतृत्व केवळ राजकारण करण्यापुरते मर्यादित असल्याचे पडळकर यांनी सांगितले.
वारकरी महाराज मंडळी पंढरपुरात येणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समजूतदारपणाची भूमिका दाखवत एका सामान्य वारकरी भक्ताला महापूजेचा मान द्यावा, अशी मागणी पडळकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून विठोबाची पूजा करावी. त्यांनी पंढरपुरात आषाढीच्या दिवशी येऊ नये, असा सल्ला पडळकर यांनी दिला आहे.