महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर सरकोलीत होणार अंत्यसंस्कार - आमदार भारत भालके अंत्यसंस्कार ठिकाण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांना मूत्रपिंड (किडनी) आणि मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाही झाला होता.

Bharat Bhalke
भारत भालके

By

Published : Nov 28, 2020, 11:55 AM IST

सोलापूर(पंढरपूर) - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके (वय ६०) यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. आज दुपारी चार वाजता सरकोली येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

चार वाजता होणार अंत्यसंस्कार -

भारत भालके यांचे पार्थिव आज सकाळी 7.35 वाजता पुणे येथून मार्गस्थ झालेले आहे. दुपारी 12.31 ते 1या वेळात गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवले जाणार आहे. त्यानंतर पंढरपूरवरून भालके यांच्या मूळ गावी सरकोली येथे दुपारी 1.30 ते 3.45 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. दुपारी 4 वाजता त्यांच्यावर सरकोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंढरपूर येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून आमदार भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कोरोनामुळे खालावली होती प्रकृती -

आमदार भालके यांना 30 ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर कोरोनातून बरे होऊन घरीही परतले होते. काही दिवसांनी त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. उपचारांदरम्यान त्यांची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. भारत भालके यांच्या खालावलेल्या प्रकृतीबद्दल माहिती मिळताच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी रुग्णालयात धाव घेत आमदार भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details