सोलापूर- सांगोला तालुक्याच्या हक्काचे एक लिटरही पाणी कमी होऊ देणार नाही, असे मत सांगोल्याचे आमदार अॅड. शहाजी पाटील यांनी व्यक्त केले. नीरा-देवधर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे शिल्लक राहणारे पाणी नीरा उजवा कालवा आणि डाव्या कालव्याच्या माध्यमातून लाभ क्षेत्राला समान पद्धतीने देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. त्यावर आमदार पाटील बोलत होते.
कॅबिनेटच्या या निर्णयामुळे बारामतीचे वळवलेले पाणी पुन्हा बारामतीला मिळणार आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याच्या लाभ क्षेत्राला नुकसान होणार आहे, अशी भीती काही शेतकऱ्यांना वाटत आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.