सोलापूर- सर्वांना हक्काची घरे मिळाली पाहिजेत यासाठी 2020-22 पर्यंत प्रत्येक गावात गृहनिर्माण संस्था उभारण्यात येतील, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 पर्यंत सर्वांना घरकूल देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहेत. याच धर्तीवर आपण गावागावात गृहनिर्माण संस्था उभा करणार असल्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर येथे विविध विकासकामांचा शुभारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
रस्ता खडीकरण डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला मुलभूत सोयीसुविधा असलेली गृहनिर्माण संस्था येत्या काळात उभारणार, दक्षिण सोलापूरचा विकास करण्यासाठी सदैव कटीबद्ध आहे, आतापर्यंत विकासकामांसाठी भरघोस निधी दिलेला आहे. उर्वरित कामे, रोजगार यासाठी देखील यापुढे प्रयत्न करत राहीन, अशी ग्वाही सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना दिली.
गावागावात गृहनिर्माण संस्था उभारणार - सहकारमंत्री सुभाष देशमुख मौजे सादेपूर, बरूर, चिंचपूर टाकळी येथे दक्षिण सोलापूर मतदारसंघाच्या विकास कामांसंदर्भात सुभाष देशमुख यांनी दौरा केला, नागरिकांशी संवाद साधला. बरूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. भरपूर मोठे व्हा ! त्यासाठी चिकाटीने अभ्यास करा, गावचे नाव उज्ज्वल करा, असे सुभाष देशमुख यांनी सांगितले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून निंबर्गी - सादेपूर - दावल मलिक वस्ती, टाकळी - बरून - सलगरवस्ती आणि राष्ट्रीय महामार्ग १३ - टाकळी ते चिंचपूर रस्ता खडीकरण-डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.