सोलापूर- सोलापूर शहर आणि ग्रामीण अशा दोन विभागात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन्स येथे बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत 2024 च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात भाष्य केले. गेल्या निवडणुकीत 114 जागा लढविल्या होत्या. यंदा त्यापेक्षा अधिक जागा लढवू आणि शंभर किंवा त्यापेक्षा अधिक आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणू असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच येणाऱ्या काळात जितक्या जागा लढण्याची संधी मिळेल त्या सर्व जागा निवडून आणण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मात्र पाहिले प्राधान्य महाविकास आघाडीच असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राला अनुभव, चंद्रकांत पाटलांचं भाष्य खरं होत नाही -
दिशा सॅलीयन प्रकरणी 7 मार्च पर्यंत सर्व पुरावे समोर येतील. त्यामुळे काहीही घाबरू नका. या प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे आणि कोणाला जेलमध्ये जावे लागेल हे स्पष्ट होईल, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांना पुढचे प्रश्न विचारवेत. त्यांना काय माहिती आहे, किंवा नाही याबद्दल मला माहित नाही. पण ते जे बोलत आहेत, प्रत्येक वेळी खरे होतं असे नाही, हा महाराष्ट्राचा अनुभव आहे, असे असे म्हणत चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढला. त्याचप्रमाणे दिशा सॅलीयनच्या मृत्यूनंतर तिच्या मृत्यूचे पुरावे समोर आलेले नसताना तिच्या चारित्र्य बद्दल आणि मृत्यूच्या कारणाबद्दल विनाकारण माध्यमात तिची बदनामी करण्याचे काही लोक काम करत आहेत. ती आपल्यातुन गेलेली आहे. तिच्या मृत्यूबाबत काही पुरावे असते तर आतापर्यंत समोर आले असते. त्या मुलीच्या बाबतीत सतत उल्लेख करणे एखाद्या राजकिय नेत्याला बदनाम करण्यासाठी दिशाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणे हे योग्य नव्हे. दिशाच्या मृत्यूसंदर्भात कोणतेही पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्यावे असेही जयंत पाटील म्हणाले.