सोलापूर - गवताळ माळराने हे जैवविविधतेच्या दृष्टीने शहर आणि जिल्ह्याचे वैभव आहे. त्यावरील कीटक भक्ष्य मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे हिवाळ्यात स्थलांतर करत युरोप, रशिया, कझाकीस्तान येथून चार ते साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत सोलापूरला येणाऱ्या पक्ष्यांमध्ये 'भोवत्या' हा पक्षी आहे. या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या बंगळुरू येथील 'एट्री' या संस्थेच्या पक्षीतज्ञांनी मागील आठवड्यात अशा तीन पक्ष्यांना 'जीएसएम सोलार टॅग' लावून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे.
सोलापुरात स्थलांतरीत 'भोवत्या' पक्ष्यांना जीएसएम सोलारटॅग - सोलापुरात स्थलांतरीत 'भोवत्या' पक्ष्यांना जीएसएम सोलारटॅग
चार ते साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास करत सोलापूरला येणाऱ्या पक्ष्यांमध्ये 'भोवत्या' हा पक्षी आहे. या पक्षांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या बंगळुरू येथील 'एट्री' या संस्थेच्या पक्षीतज्ञांनी मागील आठवड्यात अशा तीन पक्ष्यांना 'जीएसएम सोलार टॅग' लावून त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले आहे.
लाखमोलाची टॅग
भोवत्या पक्षाला बसवण्यात आलेल्या जीएसएम सिम आणि त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर सह एका पक्ष्याला अडीच लाख रुपये खर्च येतो. भोवत्याच्या अभ्यासासाठी मागील पंधरा वीस दिवसांपासून प्रिन्सिपल इन्व्हेस्टीगेटर टी गणेश आणि प्रशांत तसेच पक्ष्यांसंदर्भात पीएचडी करणारे अर्जुन कन्नन ,आणि त्यांचे सहकारी चीयान हे तामिळनाडू चे पक्षी अभ्यासक सोलापूर मुक्कामी आहेत . बंगळुरुस्थित 'एट्री 'या संस्थेच्या वतीने भारतातील राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक या पांच राज्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे
भोवत्या किंवा हारिण का म्हणतात?
पक्ष्यांची मराठी नावे ही त्यांच्या रंग, रूप आणि स्वभाव वैशिष्ट्ये आणि शिकारीच्या पध्दतीनुसार ठरलेली आहेत. पॅलिड हॅरिअर ह्या परदेशी पाहुण्या पक्षाचे नावसुद्धा त्याच्या विहारावर ठरले असून तो आपले अन्न आणि भक्ष्य असलेल्या परिसराभोवती सतत घिरट्या मारतो म्हणून त्याला भोवत्या म्हणतात. गवताळ माळरानातील सावज हेरून हरणाच्या चपळतेने,सफाईदारपणे शिकार करण्याच्या वैशिष्ट्यामुळे त्याला हारिण असेही म्हणतात.
जीएसएम टॅग
जीएसएम टॅगहेमोबाइलमध्ये असणाऱ्या सिमचा वापर करून पूर्णतः सौरऊर्जेवर चालणारे साडेनऊ ग्रॅम वजनाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण असते. ते पक्ष्याच्या पाठीवर बांधण्यात येते. यालाच 'जीएसएम टॅग 'असे म्हटले जाते. पक्ष्यांच्या दिनचर्येवरील हालचाल आणि विहारावर ह्या टॅगमुळे कोणतीही अडचण येत नाही. वजनाने हलके असल्याने पक्षी ते सहज वाहून नेऊ शकतात. या टॅगमध्ये असलेल्या सोलार पॅनेलमुळे जीपीएस प्रणालीद्वारे सतत माहिती देत संदेशवहनाचे कार्य चालू असते. त्याद्वारे त्यांचा अधिवास, हालचाली, त्या परिसराचा अभ्यास, आगमन आणि परतीचा प्रवास व याबाबतची सविस्तर माहिती मिळते. पक्ष्यांचा शास्त्रोक्त अभ्यास करताना ते उपयुक्त असते.
सोलापूर हे भोवत्या पक्ष्यांसाठी जंक्शन
हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात भोवत्या किंवा हारिण पक्ष्यांचे थवे सोलापूरात हमखास दिसतात. कझाकीस्तानहून निघालेले हे पक्षी भारतात राजस्थान, गुजरातमार्गे महाराष्ट्रातील नाशिक आणि सोलापूरात येतात. पुढे दक्षिणेकडील राज्यात जाताना जास्त काळ सोलापूरात मुक्कामी असतात म्हणून पक्षीअभ्यासक सोलापूरला भोवत्याचे 'जंक्शन' मानतात. सोलापूर परिसरात तिन्ही प्रजातीच्या पाचशे ते सहाशे पक्ष्यांचे आगमन झाले आहे. पाच राज्यातील जवळपास पस्तीस भोवत्या पक्ष्यांना टॅग लावण्यात येणार आहे.
'गंगी' चे चौथ्यांदा गंगेवाडीत पुनरागमन
चार वर्षांपूर्वी टॅग लावलेल्या 'गंगी' या 'माँटयुग्यू हॅरीअर' या भोवत्या पक्ष्याने सोलापूर ते कझाकीस्तान असा प्रवास करत चौथ्यांदा गंगेवाडीत प्रवेश केला आहे.
यंदा प्रथमच भोवत्याच्या पिलाला टॅग
पक्षी अभ्यासकांनी यंदा सोलापुरातून तीन पक्ष्यांना टॅग लावले असून दोन वयस्क असून तिसरा मात्र साडेचार हजार किमीचा प्रवास करत आलेले नऊ महिन्यांचे पिल्लू आहे.