सोलापूर- उत्तर भारतात जाण्यासाठी मंगळवारी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशनवरून रेल्वे सूटणार आहे, असा मेसेज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून अनेकजणांना आला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून मेसेज आल्यामुळे ज्यांनी-ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, असे कामगार सोलापूर रेल्वे स्टेशनवर जमा झाले. मात्र, सोलापुरातून कोणतीही रेल्वे जाणार नसल्याचे सांगत पोलिसांनी या जमलेल्या कामगारांना हाकलून दिले. त्यामुळे सोलापूर प्रशासनाचा या घटनेमुळे सावळा-गोंधळ समोर आला आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हजारो मजूर अडकून पडलेले आहेत. या मजुरांनी त्यांच्या गावी परत जाण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील केले आहेत. सोमवारी संध्याकाळी ऑनलाईन अर्ज केलेल्या मजुरांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून मेसेज आला की, उद्या सकाळी तुम्हाला उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे गाडी आहे. सकाळी 10 वाजता सोलापूर रेल्वे स्टेशनवरून ही रेल्वे सूटणार आहे. असे मेसेज नोंदणी केलेल्या सर्वांना आल्यामुळे हे मजूर सकाळी-सकाळी रेल्वे स्टेशनवर हजर झाले.