सोलापूर - कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्यात लॉकडॉऊन जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विविध व्यवसाय बंद झाले असून मजुरी कामगार मूळ गावी जाण्यासाठी मार्ग शोधत आहेत. यावर उपाय म्हणून या मजुरांना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये तात्पुरता आसरा देण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.
स्थलांतरित मजुरांसाठी शाळांमध्ये निवासाची व्यवस्था - जिल्हाधिकारी
लॉकडॉऊन असल्याने विविध व्यवसाय बंद झाले असून मजुरी कामगार मूळ गावी जाण्यासाठी मार्ग शोधत आहेत. यावर उपाय म्हणून या मजुरांना शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये तात्पुरता आसरा देण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
इतर जिल्ह्यातून आलेल्या तसेच परराज्यातून आलेल्या कामगारांची सुविधा शाळांमध्ये करण्यात यावी, अशा सूचना सोलापूर महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप विभागीय अधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका मुख्य अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांना दिल्या आहेत.
प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात सध्या असलेले भविष्यात येणारे स्थलांतरित कामगार, भिक्षेकरी, निराधार, रोजंदारी कामगार यांची माहिती संकलित करावी, त्यांच्या राहण्यासाठी शाळा व इतर ठिकाणे निश्चित करावी, तेथे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह असल्याचे खात्री करावी. नसल्यास बांधकाम विभाग किंवा गट विकास अधिकारी यांच्यामार्फत त्यांची व्यवस्था उपलब्ध करावी, स्थलांतरित असलेल्या या कामगारांची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी, लागण आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कारवाई करावी, सदर व्यक्तींची देखरेख करण्यासाठी स्वयंसेवी सस्थांची मदत घ्यावी, कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती यांची यादी तयार करून संपर्क करावा, या व्यक्तींसाठी भोजन, चादर, पाणी यांची सोय उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. या सर्व कामांसाठी उपविभागीय अधिकारी यांनी सर्व यंत्रणाची मदत घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या आहेत.